ED action Iqbal Mirchi | इक्बाल मिर्चीच्या 700 कोटींच्या मालमत्तेवर टाच

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिवंगत गँगस्टर इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. ‘ईडी’ने फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 अंतर्गत इक्बाल मिर्ची आणि त्याच्या परिवाराशी संबंधित तब्बल 700.27 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील वरळी येथील मोक्याच्या ठिकाणच्या तीन प्रमुख इमारतींचा समावेश आहे. राबिया मॅन्शन, मरियम लॉज आणि सी व्ह्यू अशी या इमारतींची नावे असून, त्यांची किंमत सुमारे 497 कोटी रुपये आहे. याशिवाय, मिर्चीच्या कुटुंबीयांनी परदेशात कमावलेली मालमत्ताही जप्त करण्यात आली असून, दुबईतील सुमारे 203.27 कोटी रुपयांच्या आलिशान मालमत्तांवर ‘ईडी’ने टाच आणली आहे.

अमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीतून उभारले साम्राज्य

मुंबई पोलिसांनी इक्बाल मिर्चीविरुद्ध भा.दं.वि., आर्म्स अ‍ॅक्ट, टाडा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल केले होते. या एफआयआरच्या आधारे ‘ईडी’ने मनी लाँडरिंगचा तपास सुरू केला. तपासात असे समोर आले की, इक्बाल मिर्ची हा ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्र विक्री यासारख्या संघटित गुन्हेगारीत गुंतला होता. या काळ्या पैशातून त्याने भारत आणि परदेशात कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या नावावर बेनामी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, वरळीतील या मालमत्ता 1986 मध्ये सर मोहम्मद युसूफ ट्रस्टकडून रॉकसाईड एंटरप्रायझेसच्या माध्यमातून अवघ्या 6.50 लाख रुपयांना खरेदी करण्यात आल्या होत्या.

परदेशातील हॉटेल आणि फ्लॅटस्वर कारवाई

इक्बाल मिर्चीचा मुलगा आसिफ इक्बाल मेमन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर दुबईत हॉटेल मिडवेस्ट अपार्टमेंट आणि कॉर्पोरेट बे व डीईसी टॉवर्समध्ये 14 रिअल इस्टेट युनिटस् खरेदी करण्यात आले होते. ‘ईडी’ने मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आसिफ मेमन, जुनैद मेमन आणि हाजरा मेमन यांच्याविरुद्ध पुरवणी तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने या तिघांनाही आधीच फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.

एक द़ृष्टिक्षेप

700.27 कोटींची जप्ती : ‘ईडी’ने दिवंगत गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाची 700.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

मुंबई आणि दुबईत कारवाई : मुंबईच्या वरळी भागातील 497 कोटींच्या तीन इमारती आणि दुबईतील 203 कोटींचे हॉटेल व फ्लॅटस् जप्त करण्यात आले.

ट्रस्टचा गैरवापर : सर मोहम्मद युसूफ ट्रस्टने इक्बाल मिर्चीसोबत संगनमत करून न्यायालयाची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले.

कुटुंबीय फरार घोषित : विशेष न्यायालयाने इक्बाल मिर्चीच्या पत्नी आणि मुलांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.



from pudharinews https://ift.tt/9vpOSmD
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url