India Russia oil trade | भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारून रशियन तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. आम्ही अमेरिकेने दिलेल्या सवलतीवर अवलंबून नसून, व्यावसायिक आणि व्यावहारिक धोरणानुसार रशियन तेल खरेदी सुरू असल्याची ठाम भूमिका सोमवारी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी मांडली.
रशियन तेल खरेदीसाठी अमेरिकेने भारताला 16 मेपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपुष्टात आली असली, तरी भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. ‘केप्लर’च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारताने रशियाकडून दररोज सरासरी 19 लाख बॅरल तेलाची खरेदी केली आहे. त्यामुळे आपण विक्रमी खरेदीच्या जवळपास पोहोचलो आहोत. सूट असो किंवा नसो, रशियाकडून यापुढेही भारताची तेल खरेदी सुरूच राहणार असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. सध्या भारतीय तेल कंपन्यांना दररोज सुमारे 750 कोटींचा तोटा होत आहे.
देशात पेट्रोल, एलपीजीचा पुरेसा साठा
पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, देशाची 60 दिवसांची गरज भागेल इतका कच्च्या तेलाचा आणि 45 दिवसांची गरज भागेल इतका एलपीजीचा साठा सध्या उपलब्ध आहे. तसेच, सर्व रिफायनरीज पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत.
from pudharinews https://ift.tt/W3zFnYa