Shivam Associates scam | बेळगावच्या शिवम असोसिएटस्ने जमविले तब्बल 4,500 कोटी; सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे येथून पैशांची उचल

बेळगाव : वर्षाला तब्बल 36 टक्के परतावा देण्याची ग्वाही देऊन गुंतवणूकदारांकडून कर्जाच्या रूपात सुमारे 4 हजार 500 कोटी रुपये जमवणार्‍या शिवम असोसिएटस् या बेळगावस्थित वित्तीय कंपनीने कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरातून कोट्यवधी रुपये उचलले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या दहा वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना दरवर्षी 36 टक्के परतावा दिलेलाही आहे. त्यामुळे कंपनीविरुद्ध थेट तक्रार झालेली नाही. मात्र, सेबीच्या नियमांचे उल्लंघन करत पैसे उचलण्यात आल्याची तक्रार कर्नाटकच्या सहकार खात्यानेच बेळगाव पोलिसांत नोंदवल्यानंतर बेळगाव पोलिसांनी कंपनीचा मालक शिवानंद नीलण्णावरला अटक केली आहे. सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी तपास हाती घेतला असून, शिवानंदला बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने दहा दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे. त्यानुसार शिवानंदला बंगळूरला नेण्यात आले आहे. त्याने नुकताच पुण्यात एक मोठा सांस्कृतिक सोहळा भरवला होता.

शिवानंद नीलण्णावर कोण?

शिवम असोसिएटस्चा मालक शिवानंद नीलण्णावर याचा जन्म हुबळी तालुक्यातील उनकल गावात झाला. त्याचे वडील सिद्धप्पा सैन्यात होते. सैन्यातून निवृत्त झाल्यावर ते कर्नाटक वीज मंडळात नोकरी करत होते. सेवेत असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर, त्या जागेवर शिवानंदच्या भावाला नोकरी लागली. भावाची बदली बेळगावला झाल्यावर संपूर्ण कुटुंब बेळगावला स्थलांतरित झाले. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शिवानंदने एका ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2004-2006 दरम्यान ऑटो रिक्षात फ्रिज ठेवून त्याने आईस्क्रीम विकले. नंतर स्वतः आईस्क्रीमचा कारखाना सुरू केला. त्यानंतर, 2012 पासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे सुमारे 15 लाख रुपये बुडाले. याच दरम्यान, शेअर मार्केटसाठी अ‍ॅक्युमन नावाचे अ‍ॅप त्याने सुरू केले. या अ‍ॅपद्वारे लोकांकडून पैसे स्वीकारण्यात येत होते.



from pudharinews https://ift.tt/YCjx6FH
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url