Cellular Aging Study | वृद्धत्व म्हणजे शरीराची झीजच नव्हे, तर जनुकांवरील नियंत्रण सुटणे

सॅन डिएगो : वाढत्या वयानुसार मेंदूतील जनुकांचे कार्य नियंत्रित करणारे ‘एपिजेनेटिक मार्कर्स’ पुसले जाऊ शकतात, ज्यामुळे शरीरात अनपेक्षित आणि गंभीर परिणाम होऊ शकतात, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. उंदरांवर केलेल्या या प्रयोगामुळे मानवी वृद्धत्वाच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा एक नवा द़ृष्टिकोन मिळाला आहे.

आपल्या जनुकीय कोडला (डीएनए) चिकटलेले लहान रासायनिक संदेश म्हणजे ‘एपिजेनेटिक मार्कर्स’. हे मार्कर्स शरीरातील कोणत्या पेशीने कसे वागावे आणि कोणते जनुक कधी सक्रिय (On) किंवा निष्क्रिय (Off) करावे, हे ठरवतात. वयानुसार या खुणा बदलतात, ज्याला वैज्ञानिक भाषेत ‘एजिंग क्लॉक’ म्हटले जाते. 11 मार्च रोजी ‘सेल’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासामध्ये, उंदरांच्या मेंदूतील 2,00,000 पेक्षा जास्त पेशींचा डेटा गोळा करून आतापर्यंतचा सर्वात गुंतागुंतीचा ‘एपिजेनेटिक नकाशा’ तयार करण्यात आला आहे.

हार्वर्ड विद्यापीठाचे अनुवंशशास्त्रज्ञ डेव्हिड सिंक्लेअर यांच्या मते, ‘वृद्धत्व म्हणजे केवळ सांधेदुखी किंवा शरीराची झीज नाही, तर जनुकांच्या नियमनावरचा ताबा सुटणे आहे.’ साल्क इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी 2 महिने (तरुण), 9 महिने (प्रौढ) आणि 18 महिने (वृद्ध) वयाच्या उंदरांच्या मेंदूचा अभ्यास केला. संशोधनात प्रामुख्याने ‘मिथाइलेशन’ या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ही प्रक्रिया जनुकांचे कार्य ‘बंद’ ठेवण्याचे काम करते. मात्र, वय वाढले की या मिथाईल खुणा कमी होतात आणि नको असलेली जनुके सक्रिय होतात. ‘केवळ डीएनएमुळे पेशी कशी बनते हे ठरत नाही, तर एपिजेनेटिक नियंत्रण ठरवते की त्या पेशीची जनुके कशी व्यक्त होतील,’ असे साल्क इन्स्टिट्यूटचे संशोधक जोसेफ एकर यांनी स्पष्ट केले.

मेंदूतील पेशींना आयुष्यभर टिकून राहावे लागते, त्यामुळे तिथे जनुकीय नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे असते. संशोधनात असे दिसून आले की : वृद्ध उंदरांच्या मेंदूतील ‘मायक्रोग्लिया’ (रोगप्रतिकारक पेशी) मध्ये मिथाईल खुणा कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक जनुके गरजेपेक्षा जास्त सक्रिय झाली. यामुळे मेंदूमध्ये अनावश्यक दाह किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. हे संशोधन मानवी मेंदूच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. जर आपण वृद्धत्वामुळे नष्ट होणार्‍या या रासायनिक खुणा पुन्हा मिळवू शकलो, तर कदाचित वृद्धत्वामुळे होणारे आजार थांबवणे किंवा उलटवणे शक्य होऊ शकते.



from pudharinews https://ift.tt/z27fUms
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url