Human Origin North Africa | मानवाच्या पूर्वजांचा उगम उत्तर आफ्रिकेत?
कैरो : मानवासह सर्व आधुनिक एपच्या पूर्वजांचा उगम नेमका कुठे झाला, याबाबतच्या जुन्या सिद्धांतांना छेद देणारे एक महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. इजिप्तमध्ये सापडलेल्या 18 दशलक्ष (1 कोटी 80 लाख) वर्षांपूर्वीच्या एका अनाकलनीय वानराच्या जीवाश्मांनी वैज्ञानिकांना चकित केले असून, मानवाचे पूर्वज पूर्व आफ्रिकेऐवजी उत्तर आफ्रिकेमधून आले असावेत, असे संकेत यातून मिळाले आहेत.
आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा समज होता की, आधुनिक वानरांचा उगम पूर्व आफ्रिकेत झाला. मात्र, 26 मार्च रोजी ‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, उत्तर इजिप्तमध्ये एका नवीन प्रजातीचे जीवाश्म सापडले आहेत. 2023 आणि 2024 मध्ये झालेल्या उत्खननात खालच्या जबड्याचे काही तुकडे आणि झिजलेले दात सापडले आहेत. याला ‘मास्रिपिथेकस मोघराएन्सिस’ (Masripithecus moghraensis) असे नाव देण्यात आले आहे. ‘मास्रिपिथेकस’ या शब्दाचा अर्थ अरबी आणि ग्रीक भाषेत ‘इजिप्शियन माकड किंवा लबाड’ असा होतो.
‘या प्रदेशात अशा प्रकारचे जीवाश्म सापडणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच आश्चर्यकारक आहे. आपला मानवी इतिहासाचा नकाशा अजूनही किती अपूर्ण आहे, हेच यातून सिद्ध होते,’ असे इजिप्तमधील मन्सूर विद्यापीठाच्या जीवाश्मशास्त्रज्ञ शौरोक अल-अश्कर यांनी सांगितले. सुमारे 25 दशलक्ष वर्षांपूर्वी वानरांचे अस्तित्व पृथ्वीवर आले होते; मात्र आधुनिक मानवाकडे जाणार्या उत्क्रांतीच्या साखळीतील खूप कमी प्रजाती पूर्व आफ्रिकेबाहेर आढळल्या आहेत.
विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, ‘मास्रिपिथेकस’ ही प्रजाती महान वानर (ग्रेट एप्सः ज्यात मानव येतो) आणि लहान वानर (गिबन्स) यांच्या विभाजनाच्या अगदी आधीच्या काळातील आहे. याचा अर्थ असा की, सर्व जिवंत वानरांचा शेवटचा सामायिक पूर्वज याच भौगोलिक प्रदेशात (उत्तर आफ्रिका) राहत असावा. स्पेनमधील इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओंटोलॉजीचे मानववंशशास्त्रज्ञ सर्जियो अल्मेसिजा यांच्या मते, ‘कोणत्याही नवीन जीवाश्माचा शोध हा मौल्यवान असतो. कारण, ते दुर्मीळ आहेत. विशेषतः ज्या भागात अशा जीवाश्मांचे अस्तित्व याआधी कधीच जाणवले नव्हते, तिथून हा शोध लागणे अधिक महत्त्वाचे ठरते.’
from pudharinews https://ift.tt/bwBGpI5