Ashadhi Wari: पंढरीत विठ्ठल-रुक्मिणीचे उद्यापासून २४ तास दर्शन

पंढरपूर : आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून 'श्रीं'चा पलंग काढून भाविकांना दि. १६ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दि. १६ जुलै रोजी विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात येणार आहे. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठलाचा पलंग काढल्यानंतर काकडा आरतीसह राजोपचार बंद होणार आहे. नित्य पूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहणार आहेत. दि. ३ ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी प्रक्षाळपूजेपर्यंत २४ तास दर्शन सुरू असणार आहे.

वारी काळात शासकीय महापूजा, मंदिर समितीमार्फत होणारी पाद्यपूजा, नित्य पूजा, श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी, विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक आदी सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आवश्यक नियोजन केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.



from pudharinews https://ift.tt/leMWO9t
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url