Sangli Crime : बनपुरी फाट्यावर आटपाडी पोलिसांचा सापळा यशस्वी; १७५ पोती प्रतिबंधित गुटखा आणि आयशर ट्रक जप्त

आटपाडी : राज्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे विशेष आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे अनेक ठिकाणी गुटखा विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, कितीही कडेकोट बंदोबस्त आणि सातत्याने कारवाया होत असल्या, तरी कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी अद्यापही सुरू असल्याचे आटपाडीतील ताज्या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आटपाडी पोलिसांनी बनपुरी फाट्यावर सापळा रचून विजापूरहून पुण्याच्या दिशेने बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे १७५ पोती प्रतिबंधित गुटखा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, जप्त मुद्देमालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलीस हवालदार प्रमोद रोडे यांना या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशेंद्रसिंग बायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद रोडे, उमर फकीर, सचिन पाटील, महेश काळे आणि गजानन देशमुखे यांनी बनपुरी फाट्यावर तातडीने नाकाबंदी केली. संशयित आयशर ट्रक क्रमांक एमएच १२ वायएफ ७५११ अडवून त्याची कसून तपासणी केली असता, ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची १७५ पोती आढळून आली.

या कारवाईमुळे एकीकडे गुटखा विक्रीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश मिळत असले, तरी दुसरीकडे सीमावर्ती भागातून गुटख्याची तस्करी अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केवळ विक्रीवरच नव्हे, तर तस्करीच्या मुळावर घाव घालण्यासाठी सीमावर्ती भागात अधिक कडक आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, आटपाडी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली असून, रात्री उशिरापर्यंत पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.



from pudharinews https://ift.tt/qGQPXWM
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url