FIFA World Cup 2026 | सूर... ताल... फुटबॉलचा थरार..! शकिरा-बर्ना बॉयच्या परफॉर्मन्सने स्पर्धेचे ऐतिहासिक उद्‌घाटन

मेक्सिको सिटी; वृत्तसंस्‍था : फिफा विश्वचषक २०२६ चा भव्य आणि ऐतिहासिक उद्‌घाटन सोहळा मेक्सिको सिटीमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला. मेक्सिकन संस्कृती, अप्रतिम संगीत आणि फुटबॉलचा उत्साह अशा त्रिवेणी संगमाने चाहत्यांना खिळवून ठेवले. जागतिक कीर्तीची गायिका शकिरा आणि नायजेरियन स्टार बर्ना बॉय यांनी या विश्वचषकाचे अधिकृत गाणे 'दाय दाय’ स्टेजवर सादर करत स्टेडियममध्ये एकच जल्लोष निर्माण केला. शकिराच्या परफॉर्मन्सच्या शेवटी मेक्सिकोच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिनिधित्व करणारे लाल, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचे स्मोक बॉम्ब हवेत सोडण्यात आले. यामुळे संपूर्ण मैदान मेक्सिकन रंगात न्हाऊन निघाले. मेक्सिकोचे प्रसिद्ध बँड 'माना' आणि 'लॉस एंजेलिस अझुलेस' यांनी आपल्या संगीताने स्थानिक चाहत्यांना वेड लावले.

मैदानाच्या अगदी मध्यभागी फिफा विश्वचषक ट्रॉफीची एक महाकाय प्रतिकृती उभारण्यात आली होती, ज्याच्या भोवती शेकडो डान्सर्सनी अप्रतिम नृत्य सादर केले. इतिहासात पहिल्यांदाच हा विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जात असून, यात ३२ ऐवजी ४८ राष्ट्रीय संघ सहभागी होत आहेत. हा विश्वचषक केवळ खेळासाठीच नाही, तर भव्य सादरीकरण आणि नव्या स्वरूपासाठी फुटबॉलच्या इतिहासात अजरामर ठरणार आहे, त्‍याचेच स्‍पष्‍ट संकेत या शानदार उद्‌घाटन सोहळ्याने दिले.

अझ्टेक संस्कृतीचा गौरव

सोहळ्याची सुरुवात मेक्सिकोच्या मूळ अझ्टेक संस्कृतीला आणि इतिहासाला मानवंदना देऊन झाली, यामध्ये पारंपरिक वेशभूषेतील शेकडो कलाकारांनी नृत्य केले. त्‍यानंतर लॅटिन संगीतातील दिग्‍गज कलाकार अलेहान्ड्रो फर्नांडिज यांनी मेक्सिकोचे राष्ट्रगीत गायले. सोहळ्यादरम्यान दोन महाकाय 'लाबुबु' कॅरेक्टर्सनी मैदानात अचानक एन्ट्री घेतली, ज्याने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. मेक्सिकन अभिनेत्री सलमा हायेक हिने या विश्वचषकाची सदिच्छा दूत म्हणून जगभरातून आलेल्या चाहत्यांचे मेक्सिको सिटीमध्ये स्वागत केले.

दिग्गज कलाकारांचे परफॉर्मन्स

डॅनी ओशन : व्हेनेझुएलाच्या या प्रसिद्ध गायकाने आपल्या ब्लॉकबस्टर गाण्यांनी स्टेडियममधील ऊर्जा आणखी वाढवली.

रायन कॅस्ट्रो : कोलंबियन स्टार रायन कॅस्ट्रोने, जे बाल्विन सोबत पॉवरफुल परफॉर्मन्स सादर केला.

टाय : 'क्वीन ऑफ पॉपियानो' म्हणून प्रसिद्ध असलेल्या टायला हिने द. आफ्रिकेचे राष्ट्रगीत सादर केले.



from pudharinews https://ift.tt/LSjgMiP
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url