Encroachment Removal | मुल्ला बाबा टेकडीवरील अतिक्रमणांवर कोर्टाचा हातोडा

सोलापूर : सोलापूर शहरातील पंचकट्टा परिसरातील श्री मार्कंडेय देवस्थानालगत असलेल्या मुल्ला बाबा टेकडी भागात गुरूवारी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली.

दोन जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याची पाच मोठी दुकाने व चार पत्र्याची घरे हटविण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५० हून अधिक पोलिस कर्मचारी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जागेसंदर्भात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे ट्रस्टी विरुद्ध हाजी हसनसाहेब वस्ताद (मयत) यांचे वारस व इतर सहा जण यांच्यात सन २००२ पासून दिवाणी न्यायालयात वाद सुरू होता. तब्बल २४ वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर न्यायालयाने संबंधित जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, सिद्धेश्वर पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक ६०५४ (गड्डा प्लॉट) मधील ही जागा पूर्वी कडबागाड्या विक्रीसाठी वापरली जात होती. सदर जागेतील कबरस्थानकडील ५२ बाय २२ फूट, श्री मार्कंडेय मंदिराच्या बाजूची १८ बाय १३ फूट तसेच त्याला लागून असलेली २४ बाय १४ फूट जागेवरील पत्र्याची शेड हटवून ती जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.त्या अनुषंगाने आज दिवाणी न्यायालयाचे चार बेलिफ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर कारवाई करण्यात आली.

कारवाई सुरू होताच काही रहिवासी व संबंधितांकडून आक्षेप नोंदविण्यात आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्यामुळे कारवाई शांततेत आणि सुरळीतपणे पूर्ण झाली.सकाळपासून सुरू असलेल्या या मोहिमेत पत्र्याचे शेड, दुकाने आणि काही निवासी बांधकामे हटविण्यात आली. न्यायालयीन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. देवस्थानच्या मालकीच्या जागेची मुक्तता झाल्याचे मानले जात असून, भविष्यात अशा वादग्रस्त अतिक्रमणांवर आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



from pudharinews https://ift.tt/r0bLIWP
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url