Farmer Loan Waiver | २०१९ च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

मुंबई : राज्य सरकारच्या सन २०१९ च्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीत चर्चा झाली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच जाहीर करतील, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले. सत्तारूढ पक्षाच्या वतीने मंगळवारी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. ‘वन टाईम सेटलमेंट’चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. व्यापारी बँकांनाही या प्रक्रियेत आवश्यक सवलती देण्यात येणार आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. मात्र, मंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या विरोधी पक्षाने संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत सभात्याग केला. मागील हंगामात शेतकऱ्यांचा २ हजार ४०७ कोटींचा विमा हप्ता भरला आहे. त्यामध्ये १७ लाख १७ हजार शेतकऱ्यांना १ हजार ५८२ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असल्याचे भरणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे थकीत २ लाख सरकार भरणार

राज्यात यापूर्वी २०१७ मध्ये दीड लाख रुपये आणि २०१९ मध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. नव्या योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये थकीत कर्जाच्या दोन लाख रुपये सरकार भरेल, तर उर्वरित रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते नियमित होऊन त्यांना पुन्हा कर्ज मिळेल.

ऑनलाईन खत नोंदणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड

खरीप हंगामात ८४ टक्के खतसाठा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने अनुदानित आणि रासायनिक खत विक्रीसाठी ‘अग्रीस्टॅक’आधारित मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन बुकिंग करण्याची सुविधा दिली आहे. त्यासाठी कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची निवड केली आहे. या दोन जिल्ह्यांत १ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी बुकिंग केले असून ३० लाख २७० मेट्रिक टन रासायनिक खत खरेदी केल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.



from pudharinews https://ift.tt/JmrTIu4
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url