AMH Test | लग्नाआधी एएमएच चाचणी करावी का?

डॉ. प्राजक्ता चौधरी

बहुतांश तरुणी शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक ध्येयांना प्राधान्य देऊन त्यांचे पालकत्व जीवन सुरू करण्यास विलंब करत आहेत. त्यामुळे लग्नाआधीच प्रजननक्षमतेबाबत (फर्टिलिटी) जागरूकता वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक अविवाहित महिलांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गर्भधारणेचा सध्या विचार करत नसतानाही आम्ही एएमएच चाचणी करून घ्यावी का?

एएमएच अर्थात अँटी-म्युलरियन हार्मोन हा अंडाशयातील लहान फॉलिकल्सद्वारे तयार होणारा हार्मोन आहे. या हार्मोनची पातळी तपासून महिलेच्या ओव्हेरियन रिझर्व्हचा म्हणजेच अंडाशयात शिल्लक असलेल्या अंड्यांच्या संख्येचा अंदाज घेता येतो. ही एक साधी रक्त तपासणी असून मासिक पाळीच्या कोणत्याही टप्प्यावर करता येते. साधारणपणे एएमएचची पातळी जास्त असल्यास अंड्यांचा साठा तुलनेने चांगला असल्याचे मानले जाते, तर कमी एएमएच पातळी अंड्यांच्या कमी साठ्याकडे निर्देश करू शकते.

मात्र एएमएच चाचणी अंड्यांची गुणवत्ता सांगत नाही. तसेच नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होईल की नाही किंवा नेमकी कधी होईल, याचाही अंदाज ही चाचणी देत नाही. तज्ज्ञांच्या मते, एएमएच चाचणीवरून निष्कर्ष काढणे योग्य नाही. महिलांचे वय, एकूण आरोग्य, मासिक पाळीच्या चक्रासंबंधी तक्रारी, सोनोग्राफीचे आणि इतर वैद्यकीय घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.

एएमएच म्हणजे फर्टिलिटी रिपोर्ट कार्ड नाही

लग्नाआधी एएमएच चाचणी करून घेणे हा वैयक्तिक निर्णय आहे. ही चाचणी भविष्यातील कुटुंब नियोजनासाठी काही महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकते. एएमएच चाचणीच्या निकाल हे प्रजननक्षमतेचे अंतिम मूल्यांकन नाही हे लक्षात असू द्यावे. त्यामुळे केवळ कमी किंवा जास्त एएमएच पातळी पाहून घाबरण्याचे कारण नाही.

फर्टिलिटीबाबत कोणतीही शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास

महिलांना त्यांच्या भविष्याबाबत अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेता येतात. त्यामुळे महिलांनी आपल्या प्रजनन आरोग्याबाबत जागरूक राहणे आणि वेळोवेळी तज्ज्ञांची सल्ला घेणे गरजेचे ठरते.

कोणत्या महिलांनी एएमएच चाचणी करावी?

प्रत्येक अविवाहित महिलेला एएमएच चाचणीची गरज असतेच असे नाही. मात्र खालील परिस्थितींमध्ये ही चाचणी उपयुक्त ठरू शकते :

• कुटुंबात लवकर रजोनिवृत्तीचा (Early Menopause) इतिहास असल्यास

• मासिक पाळी अनियमित असल्यास

• एंडोमेट्रिओसिसचा त्रास असल्यास

• अंडाशयावर पूर्वी शस्त्रक्रिया झाली असल्यास

• प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे काही वैद्यकीय आजार असल्यास

• उशिराने मूल होऊ देण्याचा विचार करत असल्यास



from pudharinews https://ift.tt/DANxFz1
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url