Chhagan Bhujbal | मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळ खेळता येत नाही!

मुंबई : आपला पुतण्या समीर भुजबळला राज्यात मंत्री करण्याची कथित अट घालणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर राज्यसभा उमेदवारी नाकारली आहे. राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात आलेल्या भुजबळ यांनी, मी कबड्डीचा खेळाडू. मला बुद्धिबळ खेळता येत नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच एकाच घरात अनेक पदे मिळतात, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा थेट उल्लेख न करता निशाणा साधला.

पक्षाचे उमेदवार राजेंद्र जैन यांनी आपला अर्ज सादर केला, त्यावेळी भुजबळही त्यांच्या सोबत होते. विधान भवन परिसर सोडण्यापूर्वी भुजबळ म्हणाले, आमच्या पक्षात एकाच घरामध्ये खासदार, आमदार आणि मंत्रिपद अशी अनेक पदे मिळतात. मात्र, आमच्या बाबतीत हा न्याय लागू होत नाही. कदाचित मी कबड्डीचा खेळाडू आहे, मला बुद्धिबळ खेळता येत नाही, म्हणून असे घडले असावे.

भुजबळ यांच्या या वक्तव्याचा रोख कोणाकडे होता, हे लपून राहिले नाही. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, भुजबळ यांची बोलण्याची एक शैली आहे. भुजबळ यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. त्यांना पक्षाने अनेकदा संधी आणि मानपानही दिला आहे. यापुढेही पक्ष त्यांना संधी देईलच. तसेच कोणत्याही पक्षात सर्वांचेच समाधान होईल असे नसते. संख्याबळानुसार मर्यादा येत असतात, असे बोलत तटकरे यांनी भुजबळ यांनी घराणेशाहीबाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले.

अर्थखात्याबाबत लवकरच भेट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आलेले अर्थखाते परत मिळवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आता १० ऐवजी ११ जून रोजी

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन १० जून रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जून रोजी नवी दिल्ली येथे असल्यामुळे ११ जून रोजी दुपारी २ वाजता षण्मुखानंद सभागृहात आता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्‍चित

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जैन यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे. परंतु, या अर्जावर अनुमोदक आणि सूचक यांच्या सह्या नाहीत. हा अर्ज छाननीत बाद होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे जैन यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे. विरोधी महाविकास आघाडीने या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस पूर्णपणे संपुष्टात आली आहे. या दोन अर्जांची मंगळवारी छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ११ जून आहे



from pudharinews https://ift.tt/rSzEIm9
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url