यवतमाळ हादरले! अंगावर वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू; आई-मुलगा गंभीर जखमी

यवतमाळ : पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत असून, यवतमाळ जिल्ह्यात एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. उमरखेड तालुक्यातील शिवाजीनगर शिवारात अंगावर वीज कोसळून एका ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याच घटनेत एक महिला आणि तिचा मुलगा गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील दराटी-कोर्टा मार्गावरील शिवाजीनगर शिवारात नंदा जीवन आडे यांचे शेत आहे. गुरुवारी दुपारी या शेतात ज्वारी काढणीचे काम सुरू होते. शिवाजीनगर येथील रहिवासी श्रीनिवास देविदास राठोड (वय ३२) हा तरुण यंत्र घेऊन ज्वारी काढण्यासाठी गेला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक हवामान बदलले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

पावसापासून बचाव करण्यासाठी श्रीनिवास हा जवळच असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली आश्रयाला गेला. त्याच्या पाठोपाठ शेतमालक नंदा आडे आणि त्यांचा मुलगा यश हे देखील झाडाकडे जात होते. दुर्दैवाने, त्याच क्षणी त्या झाडावर काळरुपी वीज कोसळली.

तरुणाचा जागीच अंत, आई-मुलगा गंभीर

विजेचा झटका इतका तीव्र होता की, श्रीनिवास राठोड याचा जागीच मृत्यू झाला. तर नंदा जीवन आडे (वय ३८) आणि यश जीवन आडे (वय १७) हे दोघेही विजेच्या धक्क्याने गंभीररित्या भाजले गेले. जखमींना तातडीने किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दुसरीकडे, उमरखेड खंड क्रमांक एक मधील शेतकरी हिरामण भुजंगा दुधेवार यांच्या शेतात असलेल्या म्हशीवरही वीज कोसळली. यात ती म्हैस जागीच ठार झाली असून, दुधेवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.



from pudharinews https://ift.tt/hL5gWNK
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url