Konkan Gurukul education | कोकणातील गुरुकुल शिक्षण

शशिकांत सावंत

गुरुकुल शिक्षण पद्धती ही परंपरा आणि आधुनिकतेचा संगम घडवणारी मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्था म्हणून पुन्हा चर्चेत येत आहे. कोकणातील काही संस्थांनी या पद्धतीचा यशस्वी अवलंब केला आहे.

गुरुकुल शिक्षण व्यवस्था ही पुरातन भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन म्हणून पुढे आली. ‘रामायण’, ‘महाभारत’ या ग्रंथांमध्ये याचे उल्लेख आढळतात. अगदी रवींद्रनाथ टागोरांपर्यंत ही पद्धती अंगीकारली गेली होती. ही व्यवस्था पुन्हा यावी म्हणून नव्या शैक्षणिक धोरणामध्ये याचा अवलंब करण्यात आला आहे. परंतु, या व्यवस्थेचा स्वीकार करून शिक्षण पुढे नेणार्‍या कोकणातील संस्था आजही आपल्याला पाहायला मिळतात.

सिंधुदुर्गात शंकर महादेव सावंत यांनी उभारलेले गुरुकुलात्मक श्रमविद्यालय आणि रत्नागिरी दापोलीमध्ये चिखलगाव येथे रेणू दांडेकर यांनी उभारलेले कौशल्यपूर्ण शिक्षण हे पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीला साजेसे शिक्षण गेल्या 40-50 वर्षांच्या कालखंडात सुरू आहे. ‘शोध मुलांच्या मनाचा, शिकूया आनंदे,’ अशी भूमिका घेऊन बालकेंद्रात शिक्षणाचे नवे आकाश या व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. परंपरेचा आणि भविष्याचा संगम असलेली गुरुकुल शिक्षण पद्धती प्राचीन भारतीय निवासी शिक्षणाची एक ओळख आहे. जिथे विद्यार्थी आणि गुरू एकत्र राहून शिक्षण घेतात. जे शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, नैतिक मूल्ये आणि अध्यात्मावर भर देणारे असते, त्यालाच गुरुकुल शिक्षण असे म्हटले गेले आहे. अलीकडे कोकणच्या शिक्षणाचा नवा पॅटर्न आपणाला सुरू झालेला दिसून येतो. राज्यात दहावी, बारावी बोर्डांमध्ये कोकण बोर्ड हा सर्वोत्तम निकालाचा बोर्ड म्हणून उदयाला आला आहे; पण याची सुरुवात काही कोकणातील शिक्षण संस्थांनी निवासी शाळांच्या माध्यमातून केली, हेही लक्षात घेतले पाहिजे.

एकेकाळी ‘लातूर पॅटर्न’चा मोठा गवगवा होता; पण तो जादा शिकवण्यांच्या मूलतत्त्वावर आधारित होता. कोकणातील निकालाचे सातत्य पाहता ‘लातूर पॅटर्न’वर कोकणने मात केली, ती निवासी पायाभूत शिक्षणाच्या आधारावर. कोकणातील 90 टक्के शाळा या मुलांच्या निवासी शिक्षणाच्या मूलतत्त्वाशी बांधिल राहून काम करणारा हा नवा पॅटर्न आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जी नवी अभ्यास पद्धती स्वीकारावी, असे सूचित केले आहे त्यामध्ये तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, योग, जीवनावश्यक कौशल्ये या तत्त्वांशी बांधिल आहेत. या शिक्षणात नैतिक मूल्यांचा समावेश आहे. चारित्र्य निर्माण, साधेपणा, प्रामाणिकपणा ही मूल्ये रुजविण्याचा आणि विद्यार्थ्याने स्वावलंबन अवलंबण्याचा त्यात समावेश आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील नवे बदल किती पचनी पडतील, हे सांगणे अवघड आहे; पण त्याची आवश्यकता मात्र नक्की आहे.

भारतासारख्या देशात शिक्षण हे परिवर्तनाचे प्रमुख साधन मानले गेले आहे. भविष्याभिमुख शिक्षण व्यवस्था ही अनिवार्य झाली आहे. सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी नवे मापदंड म्हणून ही व्यवस्था अनिवार्य ठरते. गुरुकुल व्यवस्थेचा हा गतिशील प्रयोग होऊ घातला आहे आणि त्याची सुरुवात कोकणातील काही संस्थांनी यापूर्वी सुरू केली आहे. हा सुयोगच आहे. गुरुकुल व्यवस्थेत ठरावीक कालावधीनंतर पालकांच्या भेटीची संधी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी संस्थात्मक जीवनात पूर्णपणे सामावले जातात. कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होत नाही तसेच या व्यवस्थेतील विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी शोधताना सक्षम नागरिक म्हणून पुढे येतो. या व्यवस्थेमुळे आजच्या शिक्षण व्यवस्थेत ज्या अनेक त्रुटी वारंवार जाणवतात. त्यावरही मात करणे शक्य होईल. म्हणून या व्यवस्थेकडे अधिक आत्मचिंतनातून पाहिले पाहिजे. कोकणातील काही संस्थांनी यात प्रारंभ करून दाखवला. त्यात अनेक संस्था आहेत. असेच काम करणार्‍या संस्थांचा सुवर्ण महोत्सवही होऊ लागला आहे. अशी व्यवस्था नव्या धोरणामुळे सर्वव्यापी होईल, अशी अपेक्षा करूया.



from pudharinews https://ift.tt/Emg7Fkz
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url