Solapur News: तब्बल 125 बैलगाड्यांच्या ताफ्यासह रंगांची उधळण

सोलापूर : शहरातील लोधी समाजाची पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगपंचमी रविवारी (दि. 8 मार्च) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तब्बल 150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत, लोधी गल्लीतून तब्बल 125 पेक्षा जास्त बैलगाड्यांच्या ताफ्यासह रंगांची उधळण करत ही मिरवणूक काढण्यात आली.

सकाळी लोधी गल्लीतील श्री बालाजी मंदिरात विधिवत पूजन करून उत्सवाचा प्रारंभ झाला. दुपारी मिरवणुकीपूर्वी सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या हस्ते पूजन झाले. या अनोख्या रंगसोहळ्यात सुमारे 125 बैलगाड्या सहभागी होत्या. प्रत्येक बैलगाडीवर रंगांच्या मोठ्या पिंपवजा रंगांच्या टाक्या ठेवल्या होत्या. त्यातील रंग पिचकारीद्वारे उधळण होत होती. या रंगोत्सवात लोधी समाजातील तरुण-तरुणींनी मोठा सहभाग घेतला होता. बालाजी मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक बेडरपूल, राम मंदिर, सतनाम चौक, नळबाजार आणि लष्कर मार्गे शहराच्या विविध भागांतून मार्गस्थ झाली. मार्गावर नागरिकांनीही रंगांचा आनंद लुटला. ठिकठिकाणी रंगांचे कारंजे उडवत संपूर्ण परिसर रंगमय झाला होता.

लोधी समाजातील युवक-युवतींच्या मोठ्या सहभागामुळे या दीडशे वर्षांच्या परंपरेला आधुनिक जल्लोषाची जोड मिळाली. अखेर लोधी गल्लीतच या रंगीबेरंगी मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कैय्यावाले , नामदेव मकावाले, ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम कैय्यावाले, लोधी जनजागृती युवक अध्यक्ष नागनाथ शिवशिंगवाले, ॲड. सुरेश लोढा, नगरसेवक रवी कैय्यावाले, भारत बडूरवाले यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

चोख बंदोबस्त आणि शांततेत मिरवणूक

दुपारी 2.45 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी 5.30 वाजता शांततेत संपन्न झाली. यामध्ये 155 बैलगाड्या, 15 टेम्पो आणि सुमारे 2500 नागरिकांचा जनसमुदाय सहभागी झाला होता. पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याने संपूर्ण उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडला.



from pudharinews https://ift.tt/eAKFdJ6
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url