Smart cooking machines | स्वयंपाक करतो एआय शेफ!

आशिष शिंदे

रोज सकाळी मुलांच्या टिफिनसाठी असो की, ऑफिसमधून थकून घरी आल्यावर, प्रत्येक गृहिणीपासून ते अगदी वर्किंग वूमनपर्यंत सर्वांना सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे आज जेवायला काय बनवायचे? आणि नुसते ठरवून भागत नाही, तर गॅससमोर उभे राहून फोडणी देणे, भाजी शिजतेय की नाही याकडे लक्ष ठेवणे, मसाले करपू नयेत म्हणून सतत ढवळत राहणे, हे सगळे करावेच लागते. कधी कधी मनातून वाटते ना, की हे सगळे करण्यासाठी एखादा रोबो असता तर किती मज्जा आली असती! तुमच्या स्वप्नातील हीच कल्पना आता गॅजेट वर्ल्डमध्ये प्रत्यक्षात उतरली आहे. असा एक भन्नाट ऑटोनॉमस कुकिंग रोबो बाजारात आला आहे, जो तुमचा स्वयंपाकघरातील वेळ आणि कटकट दोन्ही वाचवणार आहे.

हा काही साधासुधा स्मार्ट कुकर किंवा ओव्हन नाही. यामध्ये चक्क 2000 वॅटची इंडक्शन सिस्टीम आणि एआय कॅमेरा बसवला आहे. तुम्हाला फक्त भाजी चिरायची आहे आणि मशिनच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये (ट्रेज) तेल, पाणी आणि जिन्नस भरून ठेवायचे आहेत. यासाठी यात 8 कप्प्यांचा एक खास स्पाईस रॅक दिला आहे. तुम्ही मोबाईल अ‍ॅपवर रेसिपी निवडली की या रोबोचे काम सुरू! हा रोबो स्वतःच्या एआय कॅमेर्‍याने पदार्थाचा रंग आणि पोत बघून ठरवतो की, तो शिजला आहे की नाही. नुसता टायमर लावून हे मशिन थांबत नाही, तर अगदी एखाद्या कसलेल्या शेफसारखे लक्ष ठेवून, योग्य वेळी मसाले टाकून आणि स्वतःहून सतत ढवळून हा रोबो चविष्ट जेवण बनवतो.

या स्मार्ट शेफच्या अ‍ॅपवर 500 पेक्षा जास्त रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला बटर चिकन खायचेय की मॅक अँड चीज, फक्त मोबाईलवरून कमांड द्या आणि निवांत बसा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वयंपाक करताना सतत गॅसजवळ थांबण्याची कटकट याने पूर्णपणे संपवली आहे. शिवाय स्वयंपाक झाल्यावर भांडी घासण्याचा कंटाळाही याने दूर केला आहे. कारण याचे सर्व पार्टस् (पॅन, स्टिरर, ट्रे) सहज वेगळे करून डिशवॉशरमध्ये किंवा पाण्याने धुता येतात. म्हणजे माणसाच्या हातची चव आणि रोबोची परफेक्शन असा हा हटके संगम आहे.

सध्या बाजारात विविध कामे करणारे रोबो उपलब्ध आहेत. किंबहुना आगामी काळात रोबोटिक्स आणखी विस्तारणार असून त्यात वेगाने बदलही होत आहेत. चीनमध्येतर ह्युमनॉईड रोबो विक्रीदेखील सुरू झालेली आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे रोबोटस्चे हे क्षेत्र वाढत जाऊन नवनवीन स्पेशलाईज्ड रोबो विशिष्ट कामासाठी येत राहणार आहेत.

सध्या या स्वयंपाक बनविणार्‍या रोबोची किंमत 1,499 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. किंमत थोडी जास्त वाटत असली, तरी प्रीमियम तंत्रज्ञानाचा हा एक उत्तम नमुना आहे. एकूणच काय, तर भविष्यात स्वयंपाकघरातील कटकटी कमी करण्यासाठी आपल्याला एखाद्या आचार्‍याची नाही, तर अशा एआय रोबोची मदत घ्यावी लागणार आहे.



from pudharinews https://ift.tt/Gbqfz3i
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url