‌Gokul Dairy : ‘गोकुळ‌’चे महिलांना 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण

कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त गोकुळने संलग्न दूध संस्थांच्या महिला दूध उत्पादकांना दोन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण दिले आहे. नारी सन्मान विमा योजनेतून पहिल्या टप्प्यात एक लाख महिलांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. गोकुळ शिरगाव येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते योजनेच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळच्या वतीने महिला दूध उत्पादकांसाठी ही विमा योजना राबविली आहे. विमा योजनेसाठी वार्षिक हप्ता 150 रुपये असणार आहे. यापैकी 45 रुपये अनुदान गोकुळ देणार आहे; तर 105 रुपये लाभार्थी महिलांकडून घेतले जाणार आहेत. 18 ते 70 वयोगटातील महिलांना योजनेत सहभागी होता येणार आहे. योजनेंतर्गत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अथवा अंशत: अपंगत्व, लाभार्थीचे आई, वडील अथवा पती यांचा अपघाती मृत्यू झाला, ॲसिड हल्ला तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा कंपनीच्या नियमांनुसार विमा भरपाई संबंधित लाभार्थीला मिळणार आहे. योजनेबाबतचे माहिती पत्रक प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे. यावेळी संचालक अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, अजित नरके, प्रकाश पाटील, विमा कंपनीचे मॅनेजर रिता सिन्हा, बबली रावत, स्मिता केरिमाने, पद्मजा आपटे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक अनिल चौधरी आदी उपस्थित होते.



from pudharinews https://ift.tt/ls9Vkjf
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url