Chandra Grahan 2026: आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण; सूतक काळ सुरू झाला, तुमच्या शहरात कधी दिसणार?
Chandra Grahan 2026:
नवी दिल्ली: खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्रात रुची असणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज, ३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने धार्मिक दृष्टिकोनातून याचा 'सूतक काळ' देखील ग्राह्य धरला जाणार आहे. विशेष म्हणजे हे 'खग्रास' चंद्रग्रहण असून यावेळी चंद्राचा रंग तांबूस म्हणजेच 'ब्लड मून' सारखा दिसणार आहे.
ग्रहणाची वेळ आणि कालावधी
भारतीय वेळेनुसार, ग्रहणाची सुरुवात आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी होईल आणि सांगता संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी होईल. ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे ३ तास २७ मिनिटांचा असेल.
सूतक काळ सुरू
हे ग्रहण भारतात दृश्यमान असल्याने त्याचे वेध (सूतक) पाळले जातील. ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्रग्रहणाचा सूतक काळ ९ तास आधी सुरू होतो. त्यानुसार, आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सूतक काळ सुरू झाला आहे.
चंद्रग्रहण भारतात कधी दिसणार?
आज फाल्गुन पौर्णिमेला भारतात चंद्रोदय संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी होईल. चंद्रग्रहणाची सुरुवात आणि मध्य काळ भारतात दिसणार नाही, कारण त्यावेळी चंद्र क्षितिजाच्या खाली असेल. मात्र, संध्याकाळी ५:५९ वाजल्यानंतर भारतीयांना ग्रहणाचा 'मोक्ष काळ' (शेवटचा टप्पा) पाहता येईल. भारताच्या पूर्व भागात हे ग्रहण अधिक स्पष्ट दिसेल, तर उर्वरित भागात ते अंशतः पाहता येईल.
राशींवर होणारा परिणाम
हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे. ज्योतिष तज्ञांच्यानुसार, चंद्राचा संबंध मनाशी असल्याने याचा परिणाम मानसिक स्थितीवर होऊ शकतो. सिंह, कर्क आणि कुंभ राशीच्या जातकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत आहे, त्यांना मानसिक ताण किंवा गोंधळ जाणवू शकतो.
चंद्रग्रहण म्हणजे काय?
जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, यालाच 'चंद्रग्रहण' म्हणतात. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत झाकला जातो, तेव्हा त्याला 'पूर्ण चंद्रग्रहण' म्हणतात. यावेळी विखुरलेल्या सूर्यप्रकाशामुळे चंद्र लालसर किंवा तांबूस रंगाचा दिसतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत 'ब्लड मून' म्हटले जाते.
from pudharinews https://ift.tt/0mMh3aq