IND vs PAK T20 World Cup 2026 | ‘लोहा गरम है, मार दो हतौडा!’ वरुणराजाच्या मेहेरबानीवर रंगणार भारत-पाक 'महायुद्ध'

कोलंबो; वृत्तसंस्था : जिथे फक्त धावांचा पाऊस पडत नाही तर काळजाचे ठोकेही चुकतात, अशी लढत म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान लढत! ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’ म्हणून जी ओळखली जाते, ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान लढत! इंच न इंच भूमी लढवण्यासाठी जिथे संघर्ष केला जातो, ती देखील हीच भारत-विरुद्ध पाकिस्तान लढत. एका बाजूला तगडी फलंदाजी तर दुसर्‍या बाजूला तगडी गोलंदाजी, असे समसमान बलाबल... दोन्ही संघांनी मैदान जिंकण्यासाठी पणास लावलेली प्रतिष्ठा आणि एका अर्थाने सर्वस्व पणाला लागलेले असल्याने कोलंबोतील या लढतीत खर्‍या अर्थाने ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित आहे... ‘लोहा गरम है, मार दो हतौडा!’

एकमेकांचे कट्टर वैरी म्हणून पुरेपूर नावारूपास आलेले भारत-पाकिस्तानचे कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी आज कोलंबोत आमने-सामने भिडणार असून क्रिकेटच्या मैदानातील हा रणसंग्राम अवघ्या क्रिकेट विश्वाचे मुख्य आकर्षण केंद्र ठरणार आहे. इंच न इंच भूमी लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेने दोन्ही संघ मैदानात उतरतील, त्याचवेळी अगदी एकेक चेंडूवर जीवाच्या आकांतानेच ही लढत लढली जाईल. राजकारण आणि क्रिकेटच्या वादात अडकलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना अखेर आज येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टी-20 विश्वचषकातील या सर्वात मोठ्या लढतीत भारताची मधली फळी विरुद्ध पाकिस्तानची फिरकी अशी थेट झुंज पाहायला मिळणार आहे.

राजकीय पेच सुटला, आता मैदानावर फैसला

गेल्या काही आठवड्यांपासून या सामन्यावर बहिष्काराचे सावट होते. मात्र, आयसीसी, बांगला देश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या यशस्वी मध्यस्थीनंतर पाकिस्तानने खेळण्यास होकार दिला. चाहत्यांची उत्सुकता आणि कोट्यवधींच्या आर्थिक उलाढालीमुळे या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी याला ‘फक्त एक सामना’ असे संबोधले असले, तरी पराभवामुळे होणारी टीका टाळण्यासाठी दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावतील, हे साहजिकच.

अभिषेकच्या फिटनेसवर टांगती तलवार

भारतीय संघासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे अभिषेक शर्माची तब्येत. पोटदुखीने त्रस्त असल्याने त्याला नामिबियाविरुद्ध खेळता आले नव्हते. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर सलामीसाठी संजू सॅमसन किंवा वॉशिंग्टन सुंदरचा विचार केला जाऊ शकतो. फिरकीला साथ देणार्‍या खेळपट्टीवर सुंदरचा ऑफ-स्पिन भारतासाठी अतिरिक्त पर्याय ठरू शकतो.

कुलदीप यादव ‘हुकमी एक्का’ ठरणार?

बाबर आझमच्या विरुद्ध कुलदीप यादवचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यामुळे आशिया चषकात पाकिस्तानचे कंबरडे मोडणार्‍या कुलदीपला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, कुलदीपला खेळवायचे झाल्यास फिनिशर रिंकू सिंगला बेंचवर बसावे लागेल, हा संघ व्यवस्थापनासाठी कठीण निर्णय असेल.

मधल्या फळीचा कस लागणार

स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय फलंदाजी अभेद्य वाटत होती, मात्र अमेरिकेविरुद्ध 77 धावांत 6 गडी गमावल्याने भारताचे धाबे दणाणले होते. सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी आतापर्यंत आपली जबाबदारी चोख पार पाडली असली, तरी पाकिस्तानविरुद्ध एका सांघिक कामगिरीची अपेक्षा आहे.



from pudharinews https://ift.tt/vzamj5O
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url