Solapur Accident: बार्शी-सोलापूर महामार्गावर टेम्पो-टमटम यांचा अपघात

बार्शी : बार्शी ते सोलापूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सौंदरे शिवारातील गतिरोधकाजवळ शनिवारी मध्यरात्री छोटा हत्ती टेम्पो व टमटम यांच्यात झालेल्या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू तर एक जखमी झाला आहे.

राजेंद्र सोपान राऊत ( वय ४९, रा. टेंभुर्णी नाका, इंदापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. गौरव प्रकाश राऊत (२९ , रा. टेंभुर्णी नाका, इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी आले. राऊत हे त्यांच्या टमटम (क्रमांक एमएच ४२ बी ३७७७ )ने इंदापूरकडे येत असताना गतिरोधकावर गाडीचा वेग कमी केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या छोटा हत्ती वाहन क्रमांक (एमएच १४ जीडी १७८२) ने टमटमला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की टमटम रस्त्यावर पलटी झाली.

या अपघातात राजेंद्र सोपान राऊत व छोटा हत्तीचा चालक दत्तात्रय भारत वरवडे (वय 34, रा. श्रीराम चौक, मोडनिंब, मोहोळ) जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. राऊत यांना ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. चालक वरवडेवर उपचार सुरू आहेत.

या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. छोटा हत्ती चालकाने अविचाराने, हयगयीने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवल्याने हा अपघात घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तपास हवालदार राजेंद्र मंगरुळे हे करीत आहेत.



from pudharinews https://ift.tt/6XK9VZ8
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url