US-Iran Conflict | अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटले! इराणच्या ९० सैन्यतळांवर हल्ले; १४ ठार, ७८ जखमी

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा भीषण युद्ध पेटले आहे. दोन्ही बाजूने जोरदार हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले. अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १४ जणांचा मृत्यू झाला, तर ७८ जखमी झाले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या आखातातील तळांना जोरदार लक्ष्य केले. इराणने कतार, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन सैन्यतळांवर ड्रोन हल्ले केल्याचे म्हटले आहे.

इराणी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये कुवेतची ‘पॅट्रियट क्षेपणास्त्र यंत्रणा’, कतारचा ‘अर्ली वॉर्निंग सॅटेलाईट अँटेना’ आणि बहरीनमधील अमेरिकन सैन्याच्या इंधन टाक्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांसाठी मोठ्या संख्येने ड्रोनचा वापर करण्यात आला होता. अमेरिकेने इराणवर सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणच्या सुमारे ९० सैन्य तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

या हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे साठे, लष्करी स्पीड बोटस्‌ तसेच होर्मुझ सामुद्रधुनीजवळील किनारपट्टीच्या भागात असलेल्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणमधील अहवाज येथे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पश्‍चिम आशियातील अमेरिकन कमांड सेंटर उद्ध्वस्त : इराण पश्‍चिम आशियातील अमेरिकन सैन्याचे मुख्य कमांड सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने केला आहे. अमेरिकेने पुन्हा हल्ला करण्याचे धाडस केले, तर त्यांच्या सर्व लष्करी तळांवर याहूनही तीव्र आणि जोरदार हल्ले केले जातील, असा इशारा इराणने दिला आहे.

कच्चे तेल ७९ डॉलर्सच्या घरात

अमेरिका-इराणमधील संघर्ष पुन्हा उफाळल्याने कच्च्या तेलाचे दर वधारले. ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव पाऊण टक्क्याने वाढून ७८.७२ डॉलर्स प्रतिबॅरलवर गेले आहेत.



from pudharinews https://ift.tt/o1fBIjM
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url