Political News | शरद पवारांची राष्‍ट्रवादी ‘एनडीए’सोबत? विनोद तावडे-जयंत पाटील गुप्‍त भेटीत सत्तेतील सहभागावर खल

मुंबई : शरद पवारांचा पक्ष ‘एनडीए’सोबत जाणार असल्‍याच्‍या बातम्‍यांनी पुन्‍हा एकदा उचल खाल्‍ली असून मुंबईत त्‍यासंबंधी काही घडामोडी घडल्‍याचे पुढे आले आहे. भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्‍यक्ष आ. जयंत पाटील यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी एक गुप्‍त बैठक झाल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बैठकीत शरद पवार यांचा पक्ष जर महायुती आणि केंद्रात ‘एनडीए’चा भाग झाला, तर पक्षाच्या वाट्याला सत्तेत काय वाटा येऊ शकतो, यावर सविस्तर खल झाल्याचे समजते. तावडेंसोबतच्या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी लागलीच राष्ट्रवादीच्या एका अत्यंत वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन चर्चा केल्याचेही वृत्त आहे.

शरद पवार यांनी आपल्या पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यावर विधानसभेतील १० आमदार आणि लोकसभेतील ८ खासदारांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेण्याची तसेच भाजपच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची जबाबदारी सोपवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी मुंबईत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, ही बैठक केवळ अनौपचारिक चर्चेसाठी होती, असे सांगत त्यांनी यातील राजकीय तपशील जाहीर करण्याचे टाळले.

चर्चांमध्ये तथ्य नाही : सुप्रिया सुळे

याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला अशी कुठली बैठक झाल्याचे माहीत नाही. विनोद तावडे आणि मीदेखील अनेकवेळा भेटलो आहोत. ज्या काही चर्चा वगैरे चालल्या आहेत त्याची मला खरेच गंमत वाटते आहे. अशा प्रकारच्या चर्चा मागच्या १२ वर्षांपासून सुरू आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.



from pudharinews https://ift.tt/8zpZu0o
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url