PM Narendra Modi | ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी

मेलबर्न; पीटीआय : सीमेपार दहशतवाद्यांच्या तळांवर जेव्हा स्फोट होत होते, तेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून संपूर्ण जगाने भारताच्या संरक्षण यंत्रणेची ताकद आणि विश्वासार्हता पाहिली, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मेलबर्न मीटस्‌ मोदी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मेलबर्नमध्ये सुमारे ३० हजार लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.

मेलबर्नमधील भारतीय समुदायामध्ये येऊन आपण अत्यंत सन्मानित झाल्याची भावना पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली. भारतीयांनी दाखवलेला उत्साह खरोखरच अतुलनीय असल्याचे ते म्हणाले. या भाषणादरम्यान मोदींनी भारताच्या विकासाच्या वाटचालीवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेलबर्नमधील उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ज्या भूमीवर आपण आज भेटत आहोत, तिथल्या पारंपरिक मालकांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करू इच्छितो. हा कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला आहे. यापूर्वी मी सिडनीमध्ये तुम्हाला दोनदा भेटलो आहे. मला मेलबर्नच्या लोकांना भेटण्याचीही उत्सुकता होती. म्हणूनच, यावेळी मी विचार केला की, मेलबर्नच्या लोकांशी गप्पा मारत ‘फ्लॅट व्हाईट कॉफी’चा आस्वाद घ्यावा.’

मोदींनी आठवण करून दिली की, २०१४ मधील त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा हा तब्बल २८ वर्षांनंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने केलेला पहिला दौरा होता. ‘मी तेव्हाच सांगितले होते की, भारतीय समुदायाला आता आणखी २८ वर्षे वाट पाहावी लागणार नाही. आता बघा, गेल्या १२ वर्षांतील हा माझा तिसरा दौरा आहे. माझ्या दौऱ्यांची ही हॅट्‌ट्रिक दर्शवते की, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध आज किती उंचीवर पोहोचले आहेत.’



from pudharinews https://ift.tt/KsZW14r
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url