Plane Window Glass Broke | आकाशात असताना विमानाची खिडकी तुटली आणि...

लंडन : विमान प्रवासादरम्यान विमानाच्या खिडकीची काच तुटली तर नेमकं काय होईल याचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. ग्रीसमधून जर्मनीला जाणाऱ्या रायनाएअर कंपनीच्या विमानात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. यात विमान काही हजार फूट उंचीवर आकाशात असताना इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्याचा एक भाग तुटून विमानाच्या खिडकीवर येऊन आदळला. त्यामुळे खिडकीची काच फुटली आणि हवेचा दाब अचानक कमी झाला. यावेळी त्या फुटलेल्या खिडकीजवळ बसलेला प्रवासी विमानाबाहेर खेचला गेला.

रायनएअरचे ‘फ्लाइट एफआर १८७९’ हे विमान ग्रीसच्या १ मॅसेडोनिया विमानतळावरून जर्मनीसाठी रवाना झाले होते. विमान शेजारील नॉर्थ मॅसेडोनियाच्या आकाशात असताना अचानक त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. यावेळी हवेतच मोठा स्फोट झाला. इंजिनचा एक मोठा तुकडा वेगाने उडून विमानाच्या मुख्य भागावर आदळला. यामुळे प्रवाशाच्या सीटसमोरील खिडकीची काच फुटली. काच फुटताच विमानात मोठी टायर फुटल्यासारखा आवाज झाला आणि प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. खिडकी फुटल्यामुळे विमानातील हवेच्या तीव्र दाबामुळे तिथे बसलेले ६१ वर्षीय सर्बियन पर्यटक खिडकीतून बाहेर खेचले जाऊ लागले. त्यांचे डोके आणि खांदे विमानाबाहेर गेले होते.

सुदैवाने त्यांनी सीटबेल्ट बांधलेला असल्यामुळे ते पूर्णपणे बाहेर फेकले गेले नाहीत. त्यांच्या शेजारी बसलेल्या पत्नीने त्यांचे पाय घट्ट पकडून ठेवले, तर इतर प्रवाशांनी तत्काळ धाव घेत त्यांना आत ओढले. सदर अपघात घडल्यावर पायलटने प्रसंगावधान दाखवत तत्काळ विमान मागे फिरवले आणि अवघ्या २० मिनिटांत पुन्हा ग्रीसच्या थेसालोनिकी विमानतळावर विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले. सदर प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नसली तरी त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात ओरखडे पडले आहेत. तसेच विमानातील इतर प्रवाशांना या अपघातामुळे धक्का बसल्याने त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



from pudharinews https://ift.tt/PwK0m29
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url