Vidhan Parishad Elections | विधान परिषद निवडणुकीत महायुतीला बंडखोरीचे आव्हान

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात नाराजीनाट्याचे अंक रंगले. महायुतीमधील जागावाटपात भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार असल्याचे ठरले होते. प्रत्यक्ष अर्ज भरताना मात्र मित्रपक्षांकडून बंडाचे निशाण फडकविण्यात आल्याने बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे राहिले आहे. विशेषतः रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती अशा महत्त्वाच्या मतदारसंघांत महायुतीच्या मित्र पक्षांमध्येच कुरघोड्यांचे राजकारण रंगल्याचे चित्र सोमवारी समोर आले.

राज्यातील दीर्घ काळापासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागा आणि नागपूरमधील पोटनिवडणूक अशा एकूण 17 जागांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. या अखेरच्या दिवशी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरी शमविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.

जुईली दळवी यांचा तटकरेंविरोधात अर्ज दाखल

कोकण मतदारसंघातून अजित पवार राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. मात्र, येथे सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले आणि महेंद्र दळवी या संघर्षाचा पुढचा अंक चालू झाला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या बदल्यात कोकण मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडण्याचे महायुतीत ठरल्याची चर्चा होती. त्यानुसार अनिकेत तटकरे यांनी मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, महेंद्र थोरवे, योगेश निकम, निरंजन डावखरे, प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली यांनीही अर्ज भरला आहे.

पालकमंत्रिपदासह अन्य राजकीय विषयात ठोस हाती लागेपर्यंत हा तिढा तसाच राहील, असे बोलले जात आहे. दुसरीकडे ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र उर्वरित बहुतांश जागांवर महायुती अंतर्गत बंडाचे निशाण फडकत असल्याचे दिसून आले.

फडणवीस - शिंदे तह करणार का?

महायुतीत सुमारे सहा ठिकाणी परस्परांविरुद्ध उमेदवार दिले गेल्याने निर्माण झालेली परिस्थिती शमवण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परस्परांशी चर्चा करणार का, अशी विचारणा दोन्ही पक्षांमध्ये होत आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या विषयात काही मार्ग निघू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी पक्ष आदेश पाळा, असे सांगत आपले वजन काकडे यांच्या पारड्यात टाकले आहे, असे मानले जाते. मात्र सुनील टिंगरे हे कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील माहिती आहे. नाशिक येथे छगन भुजबळही नाराज असल्याने या बेदिली आणि बंडाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बसण्याची शक्यता आहे.



from pudharinews https://ift.tt/HRNPnLV
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url