Karnataka Crime : बंगळूर हादरले! घरातून एकटी बाहेर पडलेल्या महिलेवर १० जणांचा सामूहिक बलात्कार

बंगळूर : निर्भया कांडाने देश हादरवून सोडल्यानंतर अशाच पद्धतीची माणुसकीला काळिमा फासणारी घटना दावणगिरी जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यात घडली आहे. पतीसोबत भांडण झाल्यानंतर घरातून एकटी बाहेर पडलेल्या महिलेवर १० जणांनी सामूहिक बलात्कार करून तो व्हिडिओही व्हायरल केला आहे. अत्याचार करणाऱ्या या दहाही जणांना अटक झाली आहे. ३ जूनरोजी घडलेली अत्याचाराची घटना मंगळवारी त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर उघडकीस आली.

पतीसोबत भांडण झाल्यानंतर माहेरी जाण्यासाठी सदर महिला एकटीच घराबाहेर पडली. एकट्या महिलेला गाठून दहा जणांच्या टोळक्याने सामूहिक बलात्कार केला. त्याचबरोबर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याची घटना घडली आहे.

कर्नाटकाच्या दावणगिरी जिल्ह्यातील बसवपट्टण टाऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. इस्त्री नागराज, नागराज, अर्जुन, बसवंत, कुंदूर मारुती, हेग्गा मारुती, मनू, जोगी सुनील, प्रदीप आणि मधु अशी या अटक केलेल्या १० संशयितांची नावे आहेत. सर्व संशयित १९ ते २९ या वयोगटातील असून, यलोडहळ्ळी गावचे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पतीसोबत रात्रीच्या वेळी भांडण झाल्यानंतर सदर ४१ वर्षीय महिला माहेरी जाण्यासाठी एकटीच घराबाहेर पडली. ती चालत माहेरी जात असताना कारमधून आलेल्या दोन युवकांनी मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याशी संवाद सुरू केला. ती थकली असल्याचे दिसताच त्यांनी तिला कारमध्ये घेतले, तसेच तिला थंड पेय पिण्यास दिले. त्या पेयात त्यांनी मद्य मिसळले असण्याची शक्यता आहे. ते पेय पिताच महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर ते तिला काही अंतरावर रस्त्याशेजारच्या केळीच्या बागेत घेऊन गेले. तेथे त्यांनी आणि त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर प्रसारित केले.

हे व्हिडिओ महिलेच्या गावातील लोकांपर्यंत पोचल्यानंतर लोकांनी तिला कल्पना दिली. त्यानंतर पीडितेने बसवपट्टण पोलिस ठाण्यात क्रार नोंदवली. त्यानंतर दहाही जणांना अटक झाली आहे. दावणगिरी पोलिसप्रमुख शेखर एच. टी. माहिती देताना म्हणाले, मदतीच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार केल्याचे दिसते. त्यामुळे १० जणांना अटक केली आहे. तसेच त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी हे व्हिडिओ आणि फोटो कोणकोणत्या सोशल मीडियावर प्रदर्शित केले हे तपासून ते काढून टाकले जातील. पोलिसांनी १० जणांना अटक करुन मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालायाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे.



from pudharinews https://ift.tt/I9p1s35
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url