FIFA World Cup 2026 | ७० व्या मिनिटानंतर बदली खेळाडू मानझांबीचा जलवा; स्वित्झर्लंडचा बोस्नियावर ४-१ ने दणदणीत विजय

कॅलिफोर्निया: वृत्तसंस्था : युवा खेळाडू जोहान मानझांबी याने नोंदवलेले दोन गोल आणि शेवटच्या १६ मिनिटांत संघाने केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर स्वित्झर्लंडने फिफा वर्ल्ड कप २०२६ मधील ग्रुप ‘बी’च्या सामन्यात बोस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ४-१ असा पराभव केला. या विजयासह दोन सामन्यांत ४ गुण मिळवत स्वित्झर्लंडने बाद फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.

लॉस एंजेलिस येथील ‘सोफाय स्टेडियम’वर झालेला हा सामना ७० मिनिटांपर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या बदली खेळाडू जोहान मानझांबी आणि रुबेन व्हर्गास या जोडीने सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला २० वर्षीय मानझांबीने गोल करत स्वित्झर्लंडचे खाते उघडले. यानंतर ८० व्या मिनिटाला बोस्नियाचा बचावपटू तारिक मुहरेमोविच याला 'रेड कार्ड' दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आले.

मानझांबीचा ऐतिहासिक विक्रम

८४ व्या मिनिटाला रुबेन व्हर्गासने गोल करत स्वित्झर्लंडची आघाडी २-० अशी केली. त्यानंतर ९० व्या मिनिटाला मानझांबीने वैयक्तिक दुसरा गोल करत संघाला ३-० अशी मजबूत स्थिती मिळवून दिली. या गोलसह २० वर्षे २४७ दिवस वय असलेला मानझांबी हा स्वित्झर्लंडसाठी वर्ल्ड कपमध्ये बदली खेळाडू म्हणून येत ‘दोन गोल’ करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत बोस्नियाच्या एरमिन माहमिचने एक गोल करून फरक ३-१ असा केला. परंतु, ९७ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर स्वित्झर्लंडचा कर्णधार ग्रॅनाईट झाका याने गोल करत ४-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.



from pudharinews https://ift.tt/dhfUVWz
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url