Farmers Loan Waiver | शेतकऱ्यांना ५ जुलैपासून कर्जमाफी

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना येत्या ५ जुलैपासून मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतील अटीत बदल करण्याची आणि त्यासाठी स्थापन केलेली उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल, याचा पुनरुच्चारही भरणे यांनी केला.

सोमवारी विधानसभेत सन २०२६-२७ या वर्षातील कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य , महिला आणि बालविकास विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी दिली जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार आपण पुरवणी मागणीत कर्जमाफीच्या रकमेची तरतूद केली आहे. आता या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर त्या स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जातील. त्यामुळे ५ जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अदा केली जाईल, असे भरणे यांनी सांगितले.

कृषी समृद्धी योजनेसाठी निधी दिला जात नसल्याचा मुद्दा भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना भरणे यांनी अर्थसंकल्पात यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली.

५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी

सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ होणार असून ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची रक्कम त्यासाठी लागणार आहे. कर्जमाफीच्या योजनेतील अटींमध्ये बदल करण्याची, त्यात सुधारणा करण्याची मागणी अनेक आमदारांनी चर्चेच्या दरम्यान केली होती. त्याला उत्तर देताना भरणे यांनी आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे. विरोधकांकडून भ्रम निर्माण केले जात आहे की, आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, असे त्यांनी विरोधी पक्षाला सुनावले.



from pudharinews https://ift.tt/OioT6uR
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url