Samruddhi Expressway gas leak tanker: समृद्धी महामार्गावर टँकरमधून गॅस गळती; वाहतूक ठप्प, लांबच लांब रांगा
जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सोमवारी (दि. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमधून गळती झाल्याची गंभीर घटना घडली. जालना हद्दीतील एक्झिट पॉईंट परिसरात ही गळती झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित परिसर सील केला आणि महामार्गावरील वाहतूक थांबवली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही कोंडी मंगळवारी (दि. ७) सकाळपर्यंत कायम होती. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याचे लक्षात येताच आपत्कालीन यंत्रणा आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. जालना इंटरचेंज परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भर उन्हात तासंतास अडकून पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले. अखेर गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून टँकरमधील तांत्रिक बिघाडही दुरुस्त करण्यात आला आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.
from pudharinews https://ift.tt/B59IZnx