Iran US Israel Conflict | अमेरिका - इराण शांती चर्चा बारगळणार?

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी सी : लेबनॉनमधील हिजबुल्लाह या संघटनेवरील इस्रायलच्या हल्ल्यामुळे युद्धविराम धोक्यात असताना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स इराणबरोबरच्या शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला रवाना झाले. मात्र लेबनॉनचा युद्धविरामात समावेश न केल्यास चर्चेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे अमेरिका-इराणची शनिवारपासून इस्लामाबादेत होणारी शांती चर्चा बारगळण्याची शक्यता आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीवरील अनिश्चिततेमुळे युद्धविराम टिकेल की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याचप्रमाणे दीर्घकालीन करार शक्य आहे की नाही, यावरही शंका व्यक्त होत आहे. मात्र व्हॅन्स यांनी इस्लामाबादला (पाकिस्तानची राजधानी) रवाना होण्यापूर्वी आशावादी सूर लावला.

शुक्रवारी तेलाच्या किमती चढ्या होत्या. अमेरिकेत महागाई दरही वाढलेला होता. इराणने प्रत्यक्षात होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. त्याला अमेरिकाही अपवाद नव्हती तसेच इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी लेबनॉनमधील इराण समर्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहवर हल्ले सुरू ठेवण्याचा हेका कायम ठेवला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना इस्रायली कारवाया कमी करण्यास सांगितले असूनही ते हा हेका कायम ठेवून आहेत. हे हल्ले नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यातील मतभेद उघड करतात. ट्रम्प इराणसोबत करार करून युद्ध संपवण्यास उत्सुक दिसतात. लेबनॉनचा युद्धविरामात समावेश केला नाही तर इस्लामाबाद चर्चांमध्ये सहभागी होणार नाही, असे इराणने जाहीर केले आहे.

बुधवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यांच्या मालिकेत लेबनॉनमध्ये किमान 303 लोक ठार आणि 1,150 जखमी झाले. युरोपीय नेत्यांनी इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आवाहन केले असून लेबनॉनलाही युद्धविराम चर्चेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

लेबनॉन वरील हल्ले थांबवा: गोठवलेली मालमत्ता मुक्त करा

लेबनॉनमध्ये पूर्ण शांतता आणि त्यांच्या परदेशी बँकांतील अब्जावधी डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्याशिवाय शनिवारी पाकिस्तानमध्ये होणार्‍या शांतता चर्चेला सुरुवात होणार नाही. यामुळे अमेरिका-इराण यांच्यात इस्लामाबादेत होणारी चर्चा बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी सोशल मीडियावर इशारा दिला की, हे दोन्ही मुद्दे अमेरिकेशी आधीच ठरले होते. याशिवाय चर्चा सुरू होणार नाही.

व्हान्स यांचा इशारा : अमेरिकेला खेळवू नये

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, हे पाकिस्तानातील चर्चेच्या अमेरिकी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांनी सांगितले की, ‘जर ते आम्हाला खेळवण्याचा प्रयत्न करतील तर आमची टीम त्यांना तसे करू देणार नाही.’ व्हान्स यांनी सकारात्मक निकालाची अपेक्षा व्यक्त केली; परंतु इराणने ‘लेगिटिमेट मिसअंडरस्टँडिंग’ करून लेबनॉनला युद्धविरामात समाविष्ट समजू नये, असे स्पष्ट केले.

‘या’ मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित

इराणचा अणुकार्यक्रम : अमेरिकेचे म्हणणे आहे की, इराणमध्ये कोणतेही संवर्धन होणार नाही. इराणला आपले सर्व उच्चस्तरीय समृद्ध युरेनियम बाहेर काढावे लागेल आणि अणुसुविधा बंद किंवा मर्यादित कराव्या लागतील.

होर्मुझची सामुद्रधुनी : इराण अजूनही होर्मुझवर नियंत्रण ठेवू इच्छितो आणि टोल (शुल्क) घेण्याबद्दल बोलत आहे. तर अमेरिकेला हा मार्ग पूर्णपणे खुला आणि सुरक्षित हवा आहे, कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा शुल्काशिवाय.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम : आण्विक कार्यक्रम राबवण्याबरोबरच इराण लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रनिर्मिती करीत आहे. अमेरिकेला या क्षेपणास्त्रांवर बंदी घालायची आहे.

निर्बंध हटवणे : इराणला हवे आहे की, सर्व अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध त्वरित हटवले जावेत, गोठवलेली मालमत्ता परत मिळावी आणि नुकसानभरपाईदेखील मिळावी.



from pudharinews https://ift.tt/h8ES5p0
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url