Hingoli Crime News : तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; छळामुळे जीवन संपवल्याची चर्चा

Young Man's Suspicious Death Sparks Sensation; The possibility of ending life due to torture

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा :

कळमनुरी तालुक्यातील पेठ वडगाव शिवारात एका अंध आदिवासी युवकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी छळाला कंटाळून जीवन संपवल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजण्याच्या सुमारास पेठ वडगाव शिवारातील खांडीच्या माळ परिसरात घडली. संबंधित मयत नवनाथ प्रकाश लाखाडे (वय २४ ) या युवकाने झाडाच्या फांदीला रुमालाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी नागनाथ प्रकाश लाखाडे (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक उमाकांत सातपुते (वय ३४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा नांदेड येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात ज्युनियर क्लर्क म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक हा अंध आदिवासी असून संशयित आरोपीकडून त्याच्यावर अनैसर्गिक अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जात होता. सततच्या या छळाला कंटाळून युवकाने जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संशयित आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संशयित आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



from pudharinews https://ift.tt/7dj1Mng
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url