Fake AI model scam | बनावट एआय मॉडेल अन् हजारो डॉलर्सची कमाई
युवराज इंगवले
एआयने (कृत्रिम बुद्धिमत्ता) आता अख्खे जग व्यापून टाकले आहे. छोट्या आस्थापनापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत एआयचा वापर अगदी खुबीने केला जात आहे; पण एआय वापराचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे आहेत, हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. अशातच एका भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याने ‘अॅमिली हार्ट’ नावाची एआयनिर्मित आकर्षक बनावट मॉडेल (इन्फ्लुएन्सर) तयार केली असून, त्यातून त्याने हजारो डॉलर्सची कमाई केल्याचे समोर आले आहे; पण या विद्यार्थ्याने फसवणूक केल्याचा दावा काही अमेरिकन नागरिक करत आहेत. मात्र, आपण कोणाची फसवणूक केली नसून, केवळ वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असल्यानेच एआय मॉडेल तयार केल्याचे स्पष्टीकरण त्या विद्यार्थ्याने दिले आहे.
22 वर्षीय भारतीय विद्यार्थी म्हणतो की, मी पैसे जमवत होतो. मी सुरुवातीला इतर वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नोटस् विकण्याचा प्रयत्न केला, यूट्यूब शॉर्टस् बनवले आणि सुंदर महिलांचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली. मात्र, यातून मला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यानंतर मी एआयचा (जेमिनी) वापर केला आणि हॉट गर्ल तयार करण्याचा विचार माझ्या मनात आला. ही कल्पना अगदीच सामान्य असून, अशा प्रकारची लाखो अकाऊंटस् आधीच आहेत. यानंतर मी जेमिनीसमोर काही वेगळे पर्याय मांडले. त्यावर जेमिनीने विशिष्ट गटाला लक्ष्य करण्याची कल्पना सुचवली. ज्यामुळे पैसे कमवण्याची आपोआप संधी मिळते. मात्र, जेमिनीच्या प्रवक्त्याने याचे खंडन केले. त्यांच्या मते, जेमिनी कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारसरणीला प्रोत्साहन देत नाही आणि ते वापरकर्त्याच्या सूचनेशिवाय कोणतीही ठोस शिफारस करत नाही.
जेमिनीला निष्पक्ष उत्तर देण्यासाठी तयार केले असून, ते कोणत्याही राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही. ‘अॅमिली हार्ट’ ही काल्पनिक व्यक्तिरेखा जानेवारीमध्येच तयार केली होती. ती 20 वर्षांची, न्यूयॉर्कमध्ये राहणारी नर्स असल्याचे दाखवले. या बनावट प्रोफाईलद्वारे त्या विद्यार्थ्याने दर महिन्याला काही हजार डॉलर्स कमवायला सुरुवात केली. त्याच्या मते, भारतात पूर्णवेळ नोकरी करणार्या अनेक व्यावसायिकांनाही एवढे उत्पन्न मिळत नाही. ऑनलाईन पैसे कमावण्याचा इतका सोपा मार्ग मी कधीच पाहिला नाही.
या कमाईचा मुख्य स्रोत फॅन्सली हे प्लॅटफॉर्म होते. तिथे ‘अॅमिली’ या नावाने तो पुरुषांशी चॅट करत असे आणि एआयनिर्मित बिकिनी फोटो पाठवत असे. माझे इन्स्टाग्राम संशयास्पद हालचालींमुळे एका महिन्यात बंद करण्यात आले; मात्र फेसबुक अकाऊंट अजूनही सक्रिय आहे. अकाऊंट बंद झाले नसते तरीही मी लवकरच हे काम थांबवणार होतो; कारण मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझी स्वतःची ओळख गुप्त ठेवण्याचे कारण म्हणजे मला भविष्यात अमेरिकेत शिक्षणासाठी जायचे आहे. जर माझी खरी ओळख उघड झाली, तर मला व्हिसा मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते, असे त्या विद्यार्थ्याने म्हटले आहे. या प्रकारानंतर एआयद्वारे लोकांना गोंधळात टाकणे सोपे झाले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
from pudharinews https://ift.tt/xZ6yTRk