Uddhav Thackeray: उद्धवजींनी पुन्हा आमदार व्हावे! शिवसेना उबाठा नेत्यांची मनधरणी सुरू

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाल संपत आला असून, त्यांनी पुन्हा आमदार व्हावे यासाठी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून मनधरणी सुरू झाली आहे. संसदीय राजकारणात फारसा रस नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केले असले, तरी पक्षप्रमुखांनी विधिमंडळात असणे आवश्यक असल्याचे मत त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी परिषद सदस्यत्वाचा राजीनामाही देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळीही सहकाऱ्यांनी त्यांना हा निर्णय बदलण्याचा सल्ला दिला होता. आता सदस्यत्व संपत असताना पुन्हा सभागृहात यावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, उबाठा गटातील काही खासदार आणि आमदार पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अरविंद सावंत आणि अनिल देसाई वगळता काही खासदार सत्तेकडे झुकत असल्याचे बोलले जाते. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही भूमिकेत बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील अस्वस्थता वाढत असून, उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत नेतृत्व करावे, अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे.

पूर्वी ठाकरे कुटुंबीयांनी ‘रिमोट कंट्रोल’च्या माध्यमातून पक्षकारभार सांभाळला होता. मात्र मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सभागृहाचे सदस्य व्हावे लागले. त्यामुळे पुढेही त्यांनी सक्रिय संसदीय राजकारणात राहावे, अशी अपेक्षा पक्षातील नेते, आमदार आणि खासदार व्यक्त करत आहेत. विधान परिषदेतील निवृत्त होणाऱ्या नऊ सदस्यांच्या जागांसाठी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीला संख्याबळाच्या आधारे एक जागा मिळण्याची शक्यता असून, ती जागा उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, असे मत राजकीय निरीक्षक मांडत आहेत. मात्र काँग्रेसने माघार घेतली नाही, तर या एका जागेसाठी संघर्ष करावा का, यावरही अंतर्गत चर्चा सुरू आहे.

२३ मार्च रोजी निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार असून, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा आणि संसदीय कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याआधीच त्यांनी “मी पुन्हा येईन” अशी घोषणा करावी, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे हे संसदीय कामकाजातून स्वेच्छा निवृत्तीच्या भूमिकेत असल्याचे समजते. त्यामुळे ते आपला निर्णय बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गट सक्रिय
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटही सक्रिय झाला आहे. काही खासदार एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात, असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. दिल्लीतील अलीकडील हालचाली याच दिशेने झाल्याची चर्चा आहे. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर असे पाऊल उचलणे सध्या तरी अवघड असल्याचेही मत व्यक्त होत आहे.



from pudharinews https://ift.tt/Q1B7n6I
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url