Solapur drowning incident | हिप्परगा तलाव दुर्घटना : बेपत्ता तरुणाचाही मृतदेह सापडला; दोन मित्रांचा दुर्दैवी अंत

कासेगाव (ता. द. सोलापूर) : सोलापूर शहराजवळील तळे हिप्परगा येथील तलावात बुडालेल्या दोन्ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी घडलेल्या या अपघातानंतर एकाचा मृतदेह त्याच दिवशी सापडला होता, तर मंगळवारी (दि. २४ मार्च २०२६) दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह शोधमोहीमेदरम्यान हाती लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेळगी परिसरातील जोशी गल्ली येथील भारत शिवशंकर सुरवसे (वय २८) आणि त्यांचा मित्र गिरीष सुरेश माळगे (वय २९, रा. रामदेव नगर, शेळगी, सोलापूर) हे दोघे सोमवारी दुपारी हिप्परगा तलाव परिसरात गेले होते. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी तलावात पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याची खोली व अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले.

सायंकाळी उशिरा राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत भारत सुरवसे यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, गिरीष माळगे यांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी रात्रभर प्रयत्न सुरू ठेवले. अखेर मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या मृतदेहाचा शोध लागून तो तलावातून बाहेर काढण्यात आला.

या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. कुटुंबीयांचा आक्रोश आणि मित्रांच्या अश्रूंनी वातावरण हेलावून गेले. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलाव, नदी आदी ठिकाणी पोहण्यासाठी जाताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



from pudharinews https://ift.tt/H9XMFAT
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url