Milk based plastic | दुधापासून बनवले पर्यावरणपूरक प्लास्टिक
अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) : वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील फ्लिडंर्स विद्यापीठाच्या संशोधकांनी एक क्रांतिकारी यश मिळवले आहे. त्यांनी दुधातील प्रथिनांचा वापर करून एक पातळ पारदर्शक फिल्म तयार केली आहे, जी हुबेहूब प्लास्टिकसारखी दिसते आणि काम करते; परंतु ती पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
हे प्लास्टिक कशापासून बनले आहे?
हे नवीन जैव-विघटनशील (बायोडिग्रेडेबल) मटेरियल विविध घटकांच्या मिश्रणातून तयार केले आहे: कॅल्शियम कॅसिनेट हे दुधामध्ये आढळणारे मुख्य प्रथिन आहे. मॉडीफाईड स्टार्च हा तांदूळ किंवा मक्यापासून मिळणारा पिष्टमय पदार्थ आहे. नॅनोक्ले हे नैसर्गिक बेंटोनाइट मातीचे अतिसूक्ष्म कण, ज्यामुळे या फिल्मला मजबूती मिळते. या घटकांच्या मिश्रणातून या नव्या प्लास्टिकची निर्मिती केली आहे.
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष
1. 13 आठवड्यांत विघटन : जमिनीखाली केलेल्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, हे मटेरियल सामान्य मातीत ठेवल्यास 13 आठवड्यांच्या आत (साधारण 3 महिने) पूर्णपणे कुजून नष्ट होते.
2. अन्न वेष्टनासाठी (फूड पॅकेजिंग) सुरक्षित : या मटेरियलची सूक्ष्मजीव चाचणी केली असता, ते मानवी आरोग्यासाठी सुरक्षित आणि बिनविषारी असल्याचे आढळले आहे.
3. मजबुती आणि लवचिकता : प्लास्टिकसारखी टिकाऊपणा आणि लवचिकता मिळावी यासाठी यात ग्लिसरॉल सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे.
प्लास्टिकला सक्षम पर्यायासाठी हे संशोधन मोलाचे
1950 मध्ये 2 दशलक्ष टन असलेले प्लास्टिक उत्पादन सध्याच्या काळात 475 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. एकूण प्लास्टिकपैकी 60 टक्के हे सिंगल-यूज (उदा. खाण्याच्या पदार्थांची वेष्टने) असते आणि केवळ 10 टक्के प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाते. सामान्य प्लास्टिक मध्ये अनेक विषारी रसायने असतात, ज्याचा संबंध कर्करोगाशी असू शकतो. प्रा. युहोंग टांग यांच्या मते, अन्नाच्या वेष्टनासाठी प्लास्टिकला शाश्वत पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे.
from pudharinews https://ift.tt/SWKIy4r