Harish Rana Euthanasia Case : मुलाला वाचवण्यासाठी घर विकले अन्‌‍ सारी जमापुंजीही पणाला लावली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ऐतिहासिक आणि संवेदनशील निर्णयाद्वारे गाझियाबादच्या 32 वर्षीय हरीश राणा या तरुणाला इच्छा मरणाची परवानगी दिली खरी; तथापि, त्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी केलेल्या त्यागाची आणि संघर्षाची कहाणी डोळ्यांत पाणी आणणारी आहे. आपल्या मुलाला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचे राहते घर विकले आणि उत्तरायुष्यासाठी जमा केलेली सगळी रक्कमही पणाला लावली.

हरीश राणा बी.टेकचे शिक्षण चंदीगडमध्ये घेत असताना 2013 मध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये मेंदूला गंभीर इजा होऊन तो गेल्या तेरा वर्षांपासून कोमामध्ये गेला. तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता जवळपास अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीसुद्धा अशोक आणि निर्मला राणा यांनी कोणतीही तक्रार न करता, दिवस-रात्र हरीशची सेवा केली. मुलाचा जीव वाचावा आणि तो पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहावा, यासाठी राणा दाम्पत्याने प्रयत्नांची शर्थ केली. एम्ससारख्या महागड्या रुग्णालयाचा आणि वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च पेलण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची सारी जमापुंजी पणाला लावली. एवढेच नाही, तर उपचारांचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी दिल्लीतील स्वतःचे हक्काचे घरही विकून टाकले. एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर आलेले हे संकट आणि मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावल्याचे हे उदाहरण अत्यंत हृदय पिळवटून टाकणारे ठरले आहे.

कधीकाळी एका मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपनीत काम करणारे अशोक राणा सध्या केवळ 3 हजार 600 रुपयांच्या तुटपुंज्या मासिक पेन्शनवर अवलंबून आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या वयातही ते रोज सकाळी जवळच्या क्रिकेट मैदानाबाहेर सँडविच विकतात. त्यांच्या रोजच्या जगण्यात आणि सँडविच विकणाऱ्या त्या थकलेल्या हातांमध्ये एक मोठी मूक वेदना दडलेली आहे.

आई-वडिलांचा प्रवास हृदयाला भिडणारा

अखेर, जेव्हा आपल्या मुलाच्या स्थितीत कोणतीही सुधारणा होण्याची आशा उरली नाही, तेव्हा एका आई-वडिलांना जड अंतःकरणाने आपल्याच मुलाच्या इच्छा मरणासाठी न्यायालयात लढा द्यावा लागला. मुलाला सोडून देण्याची त्यांची इच्छा नव्हती, तर त्याला 13 वर्षांच्या भयानक यातनांमधून मुक्त करण्यासाठी आणि सन्मानाने निरोप देण्यासाठी त्यांनी उचललेले हे जगातील सर्वात कठीण पाऊल होते. आपल्या मुलाच्या सन्मानासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणाऱ्या या आई-वडिलांचा हा प्रवास प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारा आहे.



from pudharinews https://ift.tt/dWHuDIv
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url