Cool Home without AC | विना एसी घर राहणार थंड!

गुवाहाटी : वाढत्या उष्म्यावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहाटीच्या संशोधकांनी एक क्रांतिकारी शोध लावला आहे. त्यांनी इमारतींना नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्यास मदत करतील, अशा अशा स्मार्ट आणि ऊर्जा-कार्यक्षम विटा विकसित केल्या आहेत. यामुळे एसी (एअर कंडीशनर) वरील अवलंबित्व कमी होऊन वीज वापरात मोठी घट होणार आहे.

संशोधकांनी पारंपरिक विटांच्या रचनेत बदल करून त्यामध्ये फेज चेंज मटेरिअल्स (पीसीएम) चा वापर केला आहे. ही द्रव्ये मेणासारखी असतात. दिवसा जेव्हा तापमान वाढते, तेव्हा या विटा उष्णता शोषून घेतात आणि स्वतः वितळतात, ज्यामुळे घरातील तापमान वाढत नाही. रात्री जेव्हा बाहेरचे तापमान कमी होते, तेव्हा या विटा साठवलेली उष्णता बाहेर सोडतात आणि पुन्हा घट्ट होतात. यामुळे 24 तास घराचे तापमान स्थिर राहण्यास मदत होते. संशोधकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या विटांच्या वापरामुळे घराच्या आतील भिंतींचे तापमान सुमारे 3 अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते. घराच्या रचनेनुसार, कुलिंगसाठी लागणार्‍या ऊर्जेमध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.

वितळताना हे द्रव्य बाहेर येऊ नये म्हणून संशोधकांनी बायोचारचा (सेंद्रिय कचरा) आधार घेतला आहे, जो या द्रव्याला पकडून ठेवतो. ही पद्धत कमी कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक प्रयत्नांशी सुसंगत आहे. सध्या या एका विटेची अंदाजित किंमत 115 ते 130 रुपये आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यावर ही किंमत कमी होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. प्रा. पंकज कलिता यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या या टीममध्ये डॉ. पुष्पेंद्र सिंह, बिटूपण दास आणि उर्बशी बोरदोलोई यांचा समावेश आहे. त्यांचे हे संशोधन जर्नल ऑफ एनर्जी स्टोरेजमध्ये प्रसिद्ध झाले आहे.



from pudharinews https://ift.tt/j3V6XL9
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url