10th Math exam paper leak | परीक्षेआधीच फुटले गणिताचे दोन्ही पेपर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी) दहावीच्या सुरू असलेल्या परीक्षेत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. गणिताच्या दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका चक्क परीक्षा होण्यापूर्वीच एका ‘टेलिग्राम’ ग्रुपवर टाकण्यात आल्या असून, याप्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे, यातील एक पेपर तीन दिवस अगोदरच ‘टेलिग्राम’ ग्रुपवर टाकण्यात आला होता. त्यानुसार ‘टेलिग्राम’ ग्रुप अ‍ॅडमिन आणि त्यातील सदस्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी फिर्याद दिली आहे. जेवळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 9 मार्च 2026 रोजी पुणे विभागीय मंडळाच्या अधिकार्‍यांना एका संशयास्पद ‘टेलिग्राम’ लिंकची माहिती मिळाली. जेव्हा मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या ग्रुपची तपासणी केली, तेव्हा संशयास्पद बाबी आढळून आल्या. 6 मार्च रोजी होणारा गणित भाग-1 चा पेपर 5 मार्चला रात्री 8 वाजून 37 मिनिटांनी या ग्रुपवर टाकण्यात आला होता. तसेच, 9 मार्च रोजी झालेला गणित भाग-2 चा पेपर तर चक्क 6 मार्चला दुपारी 4 वाजून 56 मिनिटांनी म्हणजेच तीन दिवस आधीच या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.

या ‘टेलिग्राम’ ग्रुपवर आलेले पेपर आणि राज्य मंडळाने अधिकृतपणे काढलेले पेपर यांची जेव्हा प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली, तेव्हा ते दोन्ही पेपर अगदी सारखेच असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे मोडीत निघाल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे राज्य शिक्षण मंडळाने तातडीने पावले उचलत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा पेपर नेमका कोठून लीक झाला, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.



from pudharinews https://ift.tt/ftOeZLk
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url